टाईम प्लीज



* टाईम प्लीज *

सायंकाळी घरासमोरील गार्डन मध्ये थोडा वेळ जाऊन बसणं ही माझ्या आवडत्या गोष्टींपैकी एक. निसर्ग हा खरंच एक मोठा ऊर्जास्रोत आहे, निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवला की हीच ऊर्जा मनाच्या, शरीराच्या पोकळीत जाऊन चैतन्य निर्माण करते असा आभास होतो. गार्डन मध्ये याच ऊर्जेने खेळणारी मुले बघून आपल्या लहानपणीच्या खेळाची उजळणी करणे म्हणजे सुखद अनुभव. त्यादिवशी पण मुलांचा खेळ असाच रंगात आला होता. तितक्यात सोनम च्या  आईने तिला जोरात हाक मारली सोनम ssss ! सोनमची जायची अजिबात ईच्छा नव्हती पण आई रागवेल म्हणून गेली बिचारी, जातांना जोरात ओरडून गेली 'टाईम प्लीज sssss '! मला गंमत वाटली ....दोन शब्दांची जादू बघा, गडीही टिकवून ठेवते आणि खेळही अबाधित राहतो.

सोनमचे ते दोन शब्द अजूनही कानात घुमत होते 'टाईम प्लीज.... टाईम  प्लीज....'! असे वाटले आयुष्यरूपी खेळातही आपण अशी time please  घेतली तर? मी तर म्हणेन घ्यायलाच हवी. आजच्या Globalization च्या युगात आर्थिक, सामाजिक, मानसिक पातळीवरचे खेळ सारखे खेळावे लागतात. खेळाचे नियमही कसे सारखे बदलणारे. स्थिरता अशी कोठेच नाही, अंतिम लक्ष्यही माहित नाही, त्यामुळे सगळेच नुसते धावत आहेत. प्रत्येकाच्या मनात भिती आहे... थांबलो तर संपलो. खरं तर, आहे परिस्थिती अशीच पण या धावपळीच्या खेळात विश्रांतीचे काही क्षणही गरजेचे आहेत  आणि म्हणूनच धावता धावता जरुरी आहे ती time please घेण्याची. म्हणजेच खेळ तर पूर्ण खेळायचाच पण time please  घेत घेत. आता ही time please घ्यायची कधी? आठवा बरं, लहानपणी खेळतांना आपण time please कधी घ्यायचो?कधी खेळाचे  नियम चुकवून कुणी खेळत असेल तर त्याला समजावून सांगण्यासाठी, खेळाच्या मधून कोठे जावे लागले तर त्यासाठी, टीमने खेळायच्या खेळाची बाजी हातातून निसटतेय अस वाटलं तर सगळ्या गड्यांना encourage करण्यासाठी तर कधी चक्क out होतोय असा वाटलं तरीही ही time please असायची... स्वतःला safe  करण्यासाठी. किती मज्जा नं ! मग आयुष्यातही अशी time please घ्यायची ती स्वतःला काही निवांत क्षण देण्यासाठी, सहजीवनातल्या प्रेमासाठी, चिमुकल्यांचा निरागस सहवास अनुभवण्यासाठी, ऋणानुबंधाने बांधलेल्या नात्यांसाठी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अंतरंगात डोकावण्यासाठी.

अंतरंगात डोकावून आत्मपरीक्षण करणे यासारखी उत्तम परीक्षा जगात कुठलीच नाही. यामुळे एक फायदा नक्कीच होतो, कुठे थांबायचं याची जाण येते. मला नेहमी वाटते, माणसाला आयुष्यात कुठे थांबावे एवढं जरी कळलं तरी अर्धे प्रश्न तिथेच सुटतात. आपण बऱ्याच वेळा बघतो कि भांडणं, वादावादी टोकाला जातात व त्यातून मनं दुरावतात, नातीही तुटतात.....हे सगळं योग्य वेळी नं थांबल्यामुळेच. म्हणूनच धावणं महत्वाचं  असलं तरी थांबणं आवश्यक आहे आणि हे थांबणे  म्हणजेच आपण घेतलेली time please . या time please च्या काळात कदाचित आपल्याला बऱ्याच अनुत्तरित प्रश्नांची उत्तरे मिळतील, डोक्यातल्या गुंत्यावर नवे पर्यायही सापडतील. नवीन दिशा दिसतील, स्वतःच्या चुकाही गवसतील. सततच्या धावण्यामुळे आलेल्या थकव्याचा निचरा तर होईलच आणि याचा एकंदरीत परिणाम म्हणजे वैयक्तिक, व्यावसायिक ध्येय गाठण्यासाठी नव्याने पळण्याची  ऊर्जा मिळेल.....आणि आयुष्याचे खेळही safe होतील. आपले गडीही टिकतील आणि खेळही अबाधितच राहील!
काय मग घ्यायची ना मध्ये मध्ये अशी ' टाईम प्लीज ' आपण पण? मनाचा तोल जातांना time please घ्या आणि कळवा तुमच्या आयुष्यात काही बदललं का!

---------कौन्सलर रसिका भोरे -----------

Comments